बदलापूर पालिकेत ‘विना अजेंडा’ छुप्या बैठकीचा डाव; नियोजन सभापतींच्या भूमिकेवर संशय?

बदलापुर
बदलापूर नगरपालिकेत आज (७ एप्रिल २०२६) एका अनधिकृत बैठकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. नगरपालिकेचे नियोजन सभापती श्री. संभाजी शिंदे यांनी शहरातील वास्तुविशारद (Architect) आणि नगररचनाकार श्री. धायगुडे यांच्यासोबत कोणतीही पूर्वसूचना, पत्रक किंवा अधिकृत अजेंडा नसताना एक ‘गुप्त’ बैठक घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासकीय कामा साठी अशा प्रकारे नियमबाह्य बैठक घेणे, हे गंभीर स्वरूपाचे उल्लंघन मानले जात आहे.
काय आहे नेमका प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ६ मीटरचे रस्ते ९ मीटर करण्यासंदर्भातील संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे, हा विषय यापूर्वीच प्रशासकीय राजवटीत मुख्याधिकारी (CO, KBMC) यांनी मंजूर केला असून, त्यावर रीतसर चौकशी आणि हरकतींची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिनाभरापूर्वीच हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector Office) पाठवण्यात आला आहे.
अर्थिक देवाणघेवाणीची चर्चा ?
प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, सभापती शिंदे यांनी अचानक वास्तुविशारदांची अनधिकृत बैठक का लावली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विश्वसनीय सूत्रांकडून समजते की, या बैठकीत संबंधित वास्तुविशारदांकडे ‘विशिष्ट’ आर्थिक मागणी करण्यात आली असून, विकासकांना (Developers) तसे सांगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. “मागणी पूर्ण केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून काम लगेच मंजूर करून घेऊ,” असे आश्वासनही या बैठकीत दिल्याचे समजते.
नियम पायदळी तुडवले?
नगरपालिकेच्या नियमानुसार, कोणतीही अधिकृत सभा घेण्यासाठी किमान ७ दिवस आधी अजेंडा आणि नोटीस काढणे बंधनकारक असते. मात्र, कोणताही अधिकृत विषय नसताना आणि प्रशासकीय अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करत अशा प्रकारे गुप्त बैठका घेतल्या जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची वाच्यता शहरात वाऱ्यासारखी पसरली असून, जिल्हाधिकारी या ‘विना अजेंडा’ बैठकीची दखल घेणार का? आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग याकडे वळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




