बदलापूरकरांच्या हक्काच्या खेळाच्या मैदानावर टाटा पॉवरचा विळखा; सत्ताधारी आणि प्रशासनाचा जनतेला ‘शॉक’!

बदलापूर:
शहरातील वाढत्या सिमेंटच्या जंगलात नागरिकांना मोकळा श्वास घेण्यासाठी आणि तरुण पिढीला खेळण्यासाठी हक्काची जागा उरलेली नाही. अशा परिस्थितीत, स्टेडियमसाठी आरक्षित असलेला भूखंड चक्क ‘टाटा पॉवर’ कंपनीला वीज उपकेंद्र (Substation) उभारण्यासाठी देण्याचा घाट बदलापूर नगरपालिकेने घातला आहे. नगरपालिकेचा हा निर्णय म्हणजे स्थानिक जनतेच्या आणि खेळाडूंच्या हिताचा गळा घोटण्याचा प्रकार असून, शहरात संतापाची लाट उसळली आहे.
खाजगी कंपनीचे हित जपण्यासाठी सरकारी जमिनीची खिरापत?
टाटा पॉवर ही एक बलाढ्य खाजगी कंपनी आहे. स्वतःचा नफा कमावणाऱ्या या कंपनीकडे स्वतःची जमीन खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नक्कीच आहे. मग तरीही, शहरातील महत्त्वाचे ‘स्टेडियम आरक्षण’च या कंपनीला का दिले जात आहे? बदलापूरच्या मोक्याच्या जागी इतर अनेक जागा उपलब्ध असताना, खेळाच्या मैदानावरच प्रशासनाचा डोळा का? असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
स्थानिक नेत्यांचा ‘अट्टाहास’ नेमका कोणासाठी?
या संपूर्ण प्रकरणात स्थानिक नेत्यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. टाटा पॉवरला हीच जागा मिळावी यासाठी नेत्यांचा असणारा अट्टाहास पाहून, हा निर्णय जनहितासाठी आहे की ‘टाटा’च्या हितासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना खेळाच्या मैदानाचे आरक्षण बदलण्यात इतका रस का वाटतोय? यामागे नक्की कोणते ‘अर्थकारण’ दडले आहे, याची चर्चा आता बदलापुरात रंगू लागली आहे.
जनतेच्या भावनांशी खेळ थांबवा!
बदलापूरमध्ये आधीच खेळाच्या मैदानांचा दुष्काळ आहे. भविष्यातील खेळाडू घडवण्याऐवजी, आहे ती मैदाने खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचे पाप नगरपालिका करत आहे. वीज उपकेंद्र हवेच असेल, तर ते शहराबाहेर किंवा इतर कोणत्याही बिगर-आरक्षित जमिनीवर उभारता आले असते. मात्र, आरक्षित जमिनीवर अतिक्रमण करून जनतेवर अन्याय करण्याचा हा प्रकार बदलापूरकर कदापि सहन करणार नाहीत.
प्रशासनाने आणि नेत्यांनी हा ‘अट्टाहास’ वेळीच सोडला नाही, तर आगामी काळात जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी दिला आहे.




