बदलापूर नगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प म्हणजे केवळ ‘अंकांची जादू’; विकासाचा ‘रोडमॅप’ की केवळ स्वप्नांचे गाजर?

बदलापूर: कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १०९८ कोटी ८७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. वरकरणी हा अर्थसंकल्प विकासोन्मुख वाटत असला, तरी सूक्ष्म निरीक्षणाअंती तो पूर्णपणे दिशाहीन आणि वास्तवापासून दूर असल्याचे दिसून येते.
अर्थसंल्पातील चुकिचे आणि वादग्रस्त मुद्दे
अवास्तव फुगवलेले उत्पन्न: १०९८ कोटींच्या या अर्थसंकल्पात महसुली जमा केवळ २५८ कोटींच्या आसपास असताना, इतक्या मोठ्या रकमेचा मेळ कसा घालणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधींनी सादर केलेला हा पहिलाच अर्थसंकल्प केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी आकड्यांची फुगवट केल्याची टीका होत आहे.
न्यायालयाची चपराक आणि दुर्लक्षित नागरी समस्या
मुंबई उच्च न्यायालयाने बदलापूरमधील सांडपाणी आणि ड्रेनेज व्यवस्थेवरून नगरपालिकेवर ताशेरे ओढले असतानाही, अर्थसंकल्पात या गंभीर समस्येवर ठोस तरतूद दिसून येत नाही. पायाभूत सुविधांच्या नावाखाली केवळ ‘रोड मॅप’ची चर्चा केली जात आहे.
कर वसुलीचा झुळझुळीत बनाव
मालमत्ता करात ५०% सवलतीची घोषणा करण्यात आली असली तरी, ही केवळ एक ‘अंदाजित’ घोषणा आहे ज्यावर अंतिम निर्णय प्रशासनाकडून होणे बाकी आहे. करवाढ नसली तरी जुन्या थकबाकीवर ‘अभय योजने’नंतर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे, जो सर्वसामान्यांसाठी दुहेरी फटका ठरू शकतो
योजनांची घोषणा,पण अंमलबजावणीचे काय?
‘नगराध्यक्षा सुकन्या योजना’ सारख्या आकर्षक घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र, मागील अनुभवावरून अशा योजनांसाठी निधीची उपलब्धता आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे यात मोठी तफावत असते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
एकूणच, १०९८ कोटींचा हा आकडा केवळ प्रसिद्धीसाठी वापरला गेल्याचे चित्र आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि मुख्य म्हणजे सांडपाण्याची विल्हेवाट या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडणारा हा अर्थसंकल्प ‘चुकीचा’ आणि ‘अस्पष्ट’ असल्याची भावना तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.



