Uncategorized

विशेष बातमी: बदलापूरच्या काळजात बिल्डरांनी खुपसला ‘नाला’; प्रशासन ढाराढूर, उद्याच्या महापुराची नांदी?

बदलापूर | प्रतिनिधी
ज्या नाल्यांनी पावसाळ्यात शहराचे पाणी वाहून नेणे अपेक्षित आहे, त्याच नाल्यांचा गळा घोटण्याचे पाप सध्या बदलापूरमध्ये उघडपणे सुरू आहे. पैशांच्या हव्यासापोटी काही बड्या विकासकांनी (बिल्डर्स) चक्क नैसर्गिक नाले बुजवून त्यावर सिमेंटची जंगले उभी करण्याचा सपाटा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या प्रशासनावर शहर वाचवण्याची जबाबदारी आहे, तेच स्थानिक प्रशासन या ‘नालाबंदी’च्या विळख्यात सामील असल्याचे चित्र दिसत आहे.

नैसर्गि जलस्रोतांची कत्तल 
गेल्या काही वर्षांत बदलापूर शहराचा विस्तार वेगाने झाला. मात्र, हा विस्तार करताना निसर्गाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. शहरात अनेक ठिकाणी नैसर्गिक ओढे आणि नाल्यांचे प्रवाह वळवण्यात आले आहेत किंवा ते पूर्णपणे मातीने बुजवून त्यावर इमारतींचे बांधकाम सुरू झाले आहे. ‘निसर्ग वाचवा’च्या बाता मारणारे पालिकेचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

प्रशासनाची अर्थपूर्ण साथ 
कोणतेही बांधकाम सुरू होताना नकाशाची मंजुरी आवश्यक असते. जर नाल्यावर बांधकाम होत असेल, तर या परवानग्या दिल्याच कशा जातात? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बिल्डरांनी दिलेली ‘चमकती पाकिटे’ प्रशासकीय फाईल्समधील नाल्यांना गायब करत आहेत का? अशी चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. तक्रार करूनही कारवाईचे केवळ नाटक केले जाते, प्रत्यक्षात मात्र बांधकाम ‘जैसे थे’ सुरू राहते, यातच प्रशासनाचे साटेलोटे स्पष्ट होते.
बदलापूरला ‘बुडवण्याची’ तयारी
२०१९ च्या महापुराने बदलापूरकरांना जे जेरीस आणले होते, त्यातून प्रशासन काहीही शिकलेले नाही. नाल्यांचे नैसर्गिक मार्ग अडवल्यामुळे पावसाचे पाणी शहरात शिरून मानवनिर्मित पूर येणार, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. जर आज या बिल्डरांवर आणि त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर उद्याच्या महापुराला जबाबदार कोण? असा सवाल विचारला जात आहे.

नागरिकांचा सवाल 
नाल्यांवरील बांधकामांना परवानगी देणारे अधिकारी कोण?
बिल्डरांच्या फायद्यासाठी सामान्यांचा जीव धोक्यात का टाकला जातोय?
पर्यावरण विभागाचे याकडे दुर्लक्ष का?
वेळ आली आहे आता बदलापूरकरांनी जागं होण्याची! जर आज आपण या भ्रष्टाचाराच्या नालीत शांत बसलो, तर उद्या आपल्याच घरात पावसाचे पाणी शिरल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!