बदलापुरात पोद्दार ब्रावो स्कूलच्या बसची स्विफ्ट कारला धडक; शिक्षकाची तक्रार, चालकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी रुतिकेश रोकडे
बदलापूर पूर्व परिसरात पोद्दार ब्रावो स्कूलच्या बसच्या धडकेत एका शिक्षकाच्या स्विफ्ट कारचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभो नवकुमार गोलुई, वय ३७ वर्षे, व्यवसाय शिक्षक, हे उल्हासनगर-४ येथे वास्तव्यास आहेत. फिर्यादी हे आपल्या स्विफ्ट कार क्रमांक MH 05 CV 3551 ने प्रवास करत होते. यावेळी खरवई, बदलापूर पूर्व येथील श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल समोर मागून येणाऱ्या पोद्दार ब्रावो स्कूलच्या बस क्रमांक MH 43 BG 6976 वरील चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या धडकेत सुभो गोलुई यांच्या स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले. कारची डिकी, मागील काच, दोन्ही टेल लाईट, बंपर तसेच मागील सीटचे नुकसान झाले असून इतर साहित्याचेही नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर सुभो गोलुई यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोद्दार ब्रावो स्कूलच्या बस चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस चालकांकडून अशाप्रकारे निष्काळजीपणा होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बदलापूर पूर्व पोलीस करत आहेत.




