जनतेच्या पैशावर डल्ला: केबीएमसी नगरसेवकांची इंदूरमध्ये ‘मौज-मजा’; अभ्यासाच्या नावाखाली भाजप नगरसेवकांचा ‘फॅमिली पिकनिक’ दौरा!

बदलापूर:
शहरातील कचरा व्यवस्थापन आणि वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी कुलगाव-बदलापूर नगरपालिकेच्या (KBMC) नगरसेवकांनी सध्या इंदूरचा रस्ता धरला आहे. मात्र, हा दौरा ‘अभ्यास दौरा’ नसून केवळ सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसाठी आयोजित केलेली एक आलिशान ‘सहली’ असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, पालिकेची तिजोरी रिकामी असताना आणि कर्जबाजारीपणा असतानाही प्रत्येक नगरसेवकावर तब्बल ४० हजार रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे.
कुटुंबाचा समावेश,,नियमांची पायमल्ली?
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या दौऱ्यात अनेक नगरसेवकांनी आपल्या पत्नीला सोबत नेले आहे. ज्यांची पत्नी सोबत नाही, त्यांनी चक्क भाऊ किंवा चुलत भावाला सोबत नेल्याचे समोर येत आहे. सरकारी खर्चाने होणाऱ्या अधिकृत दौऱ्यात नगरसेवकांचे नातेवाईक कोणत्या अधिकारात सहभागी झाले? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा असा गैरवापर करणे हे गंभीर असून, याप्रकरणी संबंधित नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे
फक्त भाजपाचेच नगरसेवक का?
शहर सर्वांचे असताना अभ्यासासाठी केवळ एकाच पक्षाचे (भाजप) नगरसेवक का निवडले गेले? विरोधी पक्षाच्या किंवा इतर नगरसेवकांना यात स्थान का दिले नाही? हा दौरा प्रशासकीय आहे की पक्षीय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जबाजारी पालिका आणि ‘फाईव्ह स्टार’ चैन!
बदलापूर नगरपालिका सध्या आर्थिक अडचणीत असताना नगरसेवकांसाठी रेल्वेऐवजी ‘विमान प्रवास’ आणि राहण्यासाठी ‘फाईव्ह स्टार’ हॉटेलची व्यवस्था करण्यात आली आहे. सामान्य जनतेने भरलेल्या कराचा पैसा असा पाण्यात जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. नवीन निवडून आलेले नगरसेवक विकासकामांवर लक्ष देण्याऐवजी जनतेच्या पैशावर डल्ला मारण्यात मग्न असल्याचा आरोप होत आहे.
जन आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने या दौऱ्याच्या खर्चाला आणि नातेवाईकांच्या सहभागाला मंजुरी कशी दिली? याची चौकशी करण्याची मागणी करत स्थानिक नागरिकांनी आता जनआंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. “आमच्या घामाच्या पैशाची अशी उधळपट्टी आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा संतप्त बदलापूरकरांनी दिला आहे.




