अंबरनाथ पोलिसांचा तातडीचा ‘अॅक्शन प्लॅन’! पोलीस गाडीतून नेऊन विद्यार्थिनीला मिळवून दिला ‘नीट’ परीक्षेचा प्रवेश

रविवार, २१ जून २०२६ रोजी देशपातळीवरील अत्यंत महत्त्वाची वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’ (NEET-UG 2026) पार पडली. अंबरनाथच्या परीक्षा केंद्रावर आलिशा नावाची विद्यार्थिनी परीक्षेसाठी पोहोचली, मात्र प्रवेशासाठी आवश्यक असलेले पासपोर्ट आकाराचे फोटो तिच्याकडे नव्हते. जवळ पैसे नसल्याने आणि सोबत कोणीही नातेवाईक नसल्याने ती कमालीची घाबरली होती, आणि तिला प्रवेश नाकारला जाण्याची भीती होती.तिची ही अडचण तिथे बंदोबस्ताला असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि सहायक पोलीस निरीक्षक पानसरे यांच्या लक्षात आली. वेळ अत्यंत कमी असल्याने त्यांनी अजिबात विलंब न करता स्वतःच्या खिशातून तिला आर्थिक मदत केली.’परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकृत सरकारी वाहनात महिला पोलीस अंमलदारांसह आलिशाला बसवले. गाडी थेट जवळच्या फोटो स्टुडिओमध्ये नेण्यात आली, तिथे तात्काळ तिचे फोटो काढून घेण्यात आले. फोटो हातात मिळताच तिला पुन्हा सन्मानाने परीक्षा केंद्रावर वेळेत आणले गेले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे आलिशाला अगदी वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला आणि ती कोणतीही अडचण न येता आपली नीट परीक्षा देऊ शकली.”परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही बंदोबस्तात सतर्क होतो. विद्यार्थिनीची अडचण पाहता तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून आम्ही तातडीने पावले उचलली असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.नियम पाळतानाच अंबरनाथ पोलिसांनी दाखवलेली ही संवेदनशीलता, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि तत्परतेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. ठाणे पोलीस दलाच्या Thane City Police या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरूनही या कामगिरीची दखल घेण्यात आली असून सर्व स्तरांतून या दोन्ही अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




