Uncategorized

आशा भोसले यांच्या निधनामुळे आंबेडकर जयंती सोहळा रद्द; अनुयायांमध्ये तीव्र नाराजी, श्रद्धांजली वाहून कार्यक्रम करण्याची होती मागणी

मुंबई:  आशा भोसले यांच्या निधनामुळे राज्य सरकारने शिवाजी पार्क येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा भव्य शासकीय सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हा निर्णय करोडो लोकांच्या भावना दुखावणारा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरवर्षी १४ एप्रिल रोजी चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. यंदा या उत्सवासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. मात्र, आशा भोसले यांच्या निधनानंतर पुकारण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे प्रशासनाने मुख्य कार्यक्रम रद्द केल्याचे जाहीर केले.
भावनांचा विचार व्हावा
अनुयायांचे म्हणणे आहे की, आशा भोसले या देशाचा मानबिंदू आहेत आणि त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. त्यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून जयंतीचा मुख्य सोहळा पार पाडता आला असता. मात्र, थेट कार्यक्रमच रद्द करणे हे अनाकलनीय आहे. “एकिकडे दुखवटा पाळणे योग्य असले, तरी दुसरीकडे कोटीवधी लोकांच्या अस्मितेचा विषय असलेल्या महामानवाच्या जयंती सोहळ्यावर बंदी घालणे किंवा तो रद्द करणे चुकीचे आहे,” अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत.
सरकारने फेरविचार करण्याची गरज
शासनाने केवळ कार्यक्रम रद्द करण्यावर भर न देता, मर्यादित स्वरूपात किंवा श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून हा सोहळा सुरू ठेवायला हवा होता, असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे दुरून येणाऱ्या अनुयायांची मोठी गैरसोय होत असून, जनभावनेचा आदर करत शासनाने अशा प्रसंगी समन्वयाची भूमिका घेणे आवश्यक होते.
सध्या सोशल मीडियावर या निर्णयाचा निषेध केला जात असून, प्रशासनाने यापुढे अशा संवेदनशील विषयांवर सर्वसमावेशक निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!