बदलापूर नगरपालिकेत भ्रष्टाचाराचा ‘सुकाणू’ कुणाकडे? ११ टक्क्यांच्या कमिशनसह रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली वसुलीचा डाव!

बदलापूर:
बदलापूर नगरपालिकेत सध्या लोकशाहीचा नव्हे, तर ‘टक्केवारी’चा कारभार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. नगरपालिकेतील कथित ‘सुकाणू समिती’ने विकासकांकडून थेट ११ टक्के कमिशनची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप होत असतानाच, नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे यांनी वास्तुविशारदांची (Architects) बेकायदेशीर बैठक घेऊन रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली वसुलीचा नवा फंडा शोधल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
ठेकेदारांची ‘११ टक्क्यां’साठी अडवणूक?
मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत आणि देयके मंजूर करण्यासाठी सुकाणू समितीतील काही प्रभावशाली घटक ठेकेदारांकडे ११ टक्के कमिशनचा आग्रह धरत आहेत. जोपर्यंत हा ‘टोल’ दिला जात नाही, तोपर्यंत कामांच्या फाईल्स पुढे सरकत नसल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यामुळे प्रामाणिक ठेकेदार हवालदिल झाले असून विकासकामांचा दर्जाही धोक्यात आला आहे.
रस्ता रुंदीकरणाचा मास्टर प्लॅन की वसुलीचा प्लॅन
दुसरीकडे, नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे यांनी सर्व वास्तुविशारदांची एक बैठक बोलावली होती. मुळात अशी बैठक घेण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार सभापतींना नसताना, ही बैठक कशासाठी घेण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बैठकीत ६ मीटरचे रस्ते ९ मीटर करण्याचे आमिष दाखवून विकासकांकडून मोठ्या रकमा उकळण्याचा डाव आखला जात असल्याची चर्चा आहे. रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली एफएसआय (FSI) आणि इतर तांत्रिक बाबींचा गैरवापर करून ‘लक्ष्मी दर्शन’ घडवण्याचा हा प्रकार असल्याची टीका होत आहे.
प्रशासकांचे मौन की अभय?
‘सुकाणू समिती’च्या नावाखाली समांतर प्रशासन कोण चालवत आहे? असे अनेक प्रश्न बदलापूरकर विचारत आहेत. या गंभीर बाबींकडे जिल्हाधिकारी आणि नगरविकास विभागाने लक्ष देऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
बदलापूरच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेला हा ‘टक्केवारी’चा खेळ आता उघड झाला असून, या प्रकरणातील सूत्रधार कोण? हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.




