महाराष्ट्र

स्वाभिमानाची ‘बॅटिंग’ सोडून बच्चू कडू सत्तेच्या ‘फिल्डिंग’मध्ये;,,, प्रहारची ‘धार’ बोथट?

अचलपूर: ‘आम्ही सत्तेचे नाही, तर सामान्यांचे आहोत’ अशी गर्जना करणाऱ्या बच्चू कडू यांनी अखेर सत्तेच्या गणितासमोर शरणागती पत्करली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अस्तित्व पणाला लावत बच्चू कडू यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सातत्याने ‘दिव्यांगांचे कैवारी‘ आणि ‘शेतकऱ्यांचे नेते’ म्हणून स्वतःची प्रतिमा जपणाऱ्या कडू यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या तत्त्वांना तिलांजली देणारा असल्याची टीका आता सर्वसामान्यांमधून होत आहे.
तत्त्वांना मुरड, सत्तेची ओढ?
बच्चू कडू यांनी नेहमीच प्रस्थापित राजकारण्यांवर सडकून टीका केली. मात्र, ज्यांच्यावर टीका केली, त्यांच्याच मांडवाला जाऊन बसल्याने कडूंचा ‘प्रहार’ आता केवळ नावापुरता उरला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. ज्या मुद्द्यांवरून त्यांनी रान पेटवले, ते मुद्दे आता सत्तेच्या खुर्चीसाठी बाजूला सारले गेल्याचे चित्र दिसत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
आपल्या आक्रमक शैलीमुळे बच्चू कडू यांनी राज्यभरात मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. मात्र, कोणताही विचार न करता घेतलेल्या या निर्णयामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. “आम्ही प्रहार म्हणून लढलो, आता शिंदे गटाचे झेंडे का खांद्यावर घ्यायचे?” असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
विलीनीकरणाची भीती की राजकीय तडजोड?
स्वतःचा स्वतंत्र गट असूनही सत्तेत सामील होण्याऐवजी थेट पक्षात प्रवेश करणे, हे कडू यांच्या कमकुवत राजकीय स्थितीचे लक्षण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपली जागा सुरक्षित करण्यासाठी त्यांनी हा ‘शॉर्टकट’ निवडल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
थोडक्यात सांगायचे तर, ज्या प्रहारने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, तोच आवाज आता सत्तेच्या गोंधळात हरवणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!