महाराष्ट्र

मुंबईत ‘पांढऱ्या पट्टी’वरून हायव्होल्टेज ड्रामा! मनसे आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर; सार्वजनिक ठिकाणी मनमानी खपवून घेणार नाही, आक्रमक इशारा!

मुंबई:मुंबईच्या विविध भागांत घराबाहेर, सोसायट्यांमध्ये आणि आता थेट सार्वजनिक रस्त्यांवर मारण्यात येत असलेल्या ‘पांढऱ्या पट्ट्यांचा’ वाद आता पेटला आहे. घाटकोपर, दादर आणि दक्षिण मुंबईतील चर्नी रोड परिसरात या पट्ट्यांवरून मराठी विरुद्ध जैन असा संघर्ष तीव्र झाला असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.

वादाची ठिणगी कशी पडली?

घाटकोपरमधील एका सोसायटीत कोणाचीही परवानगी न घेता जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी अशा पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकने याविरुद्ध आवाज उठवल्यानंतर हा वाद समोर आला. जैन समुदायाकडून असा दावा करण्यात आला की, अनवाणी चालणाऱ्या धर्मगुरूंचे पाय भाजू नयेत आणि पावसाळ्यात कीटक पायाखाली चिरडले जाऊ नयेत, म्हणून या पट्ट्या मारल्या जातात. मात्र, सार्वजनिक जागांचे असे धार्मिक कारणांसाठी खासगीकरण करण्याला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.🔥

दादर ते चर्नी रोड; मनसेचा आक्रमक पवित्रा!

हा वाद केवळ सोसायट्यांपुरता मर्यादित न राहता थेट दादरच्या ‘शिवतीर्थ’ परिसरातील रस्त्यांपर्यंत पोहोचला. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकाराला ‘सांस्कृतिक दहशतवाद’ म्हणत तीव्र संताप व्यक्त केला. “मुंबईवर पहिला अधिकार मराठी माणसाचा आहे, धर्माच्या नावाखाली कोणीही आपली हुकूमशाही चालवण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशारा मनसेने दिला आहे.मनसेच्या अल्टिमेटमनंतर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत या पट्ट्यांवर राखाडी किंवा काळा रंग मारून त्या पुसून टाकल्या.

चर्नी रोडमध्ये मध्यरात्री तणाव!दादर पाठोपाठ दक्षिण मुंबईतील चर्नी रोड आणि गिरगाव परिसरातही रात्रीच्या वेळी रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्याचे उघडकीस आले. यामुळे संतप्त झालेल्या ‘आम्ही गिरगावकर‘ या स्थानिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मध्यरात्रीच रस्त्यावर उतरून या पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग फासला. या प्रकारामुळे गिरगाव परिसरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

वाढत्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली असून, “विविध समाजांनी एकमेकांच्या परंपरांचा आदर राखत गुण्यागोविंदाने राहावे, परंतु आपल्या परंपरेमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी,” असे आवाहन केले आहे.सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. “मुंबईत ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही,” असा थेट इशारा आंदोलक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!