बदलापूर शहरातील नाल्यांवर विकासकांनी केलेली अतिक्रमणे हि एक दिवस शहराच्या विनाशाला कारणीभूत ठरणार आहेत,,

बदलापूर शहरातील अनेक भागांमध्ये नाल्यांवर झालेले अतिक्रमण आणि त्याला सहकार्य करणाऱ्या विकासकांच्या बेफिकीर वृत्तीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ येत असताना नाल्यांचे रुंदीकरण, साफसफाई आणि अतिक्रमण हटविण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या काही वर्षांत बदलापूर शहराचा वेगाने विकास होत असताना अनेक खाजगी विकासकांनी नाल्यांच्या कडेला व नाल्यांवरच इमारती, कंपाउंड भिंती, पार्किंग शेड तसेच व्यावसायिक गाळे उभारले आहेत. या अतिक्रमणांमुळे नैसर्गिक gट्रेनज व्यवस्था पूर्णपणे बिघडली असून, थोडा जरी जोरदार पाऊस झाला तरी पाणी नाल्यातून वाहण्याऐवजी रस्त्यावर व घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे नागरिकांना दरवर्षी जलभराव, दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आजारांच्या साथींचा सामना करावा लागत असल्याची तक्रारी सातत्याने करण्यात येत आहेत.काही ठिकाणी नाले पूर्णपणे झाकून त्यावर कॉंक्रिट स्लॅब टाकून रस्ता किंवा पार्किंग तयार केल्याचे चित्र दिसून येते, तर काही ठिकाणी नाल्यांचा प्रवाह बदलून प्लॉट वाढवण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यामध्ये काही नामांकित बिल्डर व विकासकांचा सहभाग असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या मते, नकाशा मंजूरी आणि पूर्णत्व प्रमाणपत्र (ओसी) देताना संबंधित विभागांनी नाल्यांच्या सुरक्षेसंदर्भात आवश्यक नियमांची अंमलबजावणीच केली नाही, ही गंभीर बाब आहे.पावसाळ्यातील नेहमीच्या पुरस्थितीला कंटाळलेल्या नागरिकांनी नगर परिषद आणि महसूल व पर्यावरण विभागाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. अतिक्रमणामुळे नाले अरुंद झाल्याने पाणी साचून राहते, त्यातून घाणीचे पाणी परत शेजारच्या घरांच्या कंपाउंडमध्ये आणि घरांत येते, ज्यामुळे लहान मुलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, अशीही तक्रार रहिवाशांनी नोंदवली आहे.स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाले, ओढे आणि नैसर्गिक पाण्याच्या वाटांवर झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे, जबाबदार विकासकांवर गुन्हे दाखल करून दंड आकारावा, तसेच नुकसानीस जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, शहराच्या विकासाच्या नावाखाली निसर्गाशी छेडछाड करून केलेले हे अतिक्रमण भविष्यात मोठ्या आपत्तीचे रूप घेऊ शकते.नगर परिषदेकडून मात्र “अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेण्याची तयारी सुरू असून सर्वेक्षणानंतर संबंधितांना नोटीस देण्यात येईल,” अशी माहिती दिली जात आहे असे नागरिक सांगतात. तथापि, यापूर्वीही अनेक वेळा अशा मोहिमा सुरू होऊन काही दिवसांतच थंडावल्याचा अनुभव असल्यामुळे नागरिक प्रशासनाच्या आश्वासनांबाबत साशंक आहेत.परिस्थिती लक्षात घेता, येत्या पावसाळ्यापूर्वी नाल्यांचे अतिक्रमण हटवून त्यांच्या मूळ रुंदी व खोलीनुसार स्वच्छता करणे तसेच पुढील काळात कोणत्याही विकासकास नाल्यांवर बांधकाम करण्यास अनुमती न देण्यासाठी कठोर धोरण लागू करणे, हीच काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे




