पर्यावरण रक्षक सरिता यांचा आत्मघात क्लेशदायक_(दिलिप मालवणकर जेष्ठ पत्रकार)

सरिता खानचांदनी हे नाव उल्हासनगरच्या तमाम जनतेप्रमाणेच राजकारण्यांना सुपरिचित होते. प र्यावरण रक्षण म्हटले की सरिता खानचंदानी हे नाव परवलीचा शब्द मानले जात होते. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदर्शन व जल प्रदूषण रोखण्यासाठी दिग्गजांशी पंगा घेणारी सरिता खानचंदानी आज अचानक आपल्यातून निघून गेली. ज्या निर्धाराने ती रणरागिणी बनून लढत होती त्याही मोठ्या निर्धारणे तिने आज मृत्युला कवटाळले. पाच मजली इमारतीच्या टेरेसवर जाऊन तिने परमेश्वराकडे पाहून हात जोडले व जी उडी मारली ते धैर्य सहजा सहजी कोणात नसते. तिचे हे आत्मघातकी पाऊल होते व ते कोणालाच रुचलेले नाही. कारण अश्या बेधडक सामाजिक कार्यकर्त्यांची समाजाला नितांत गरज असताना व असे कार्यकर्ते दुर्मिळ झालेले असताना सरिता मॅडम सारख्या झुंझार कार्यकर्तीने आत्मघात करणे ही फार मोठी सामाजिक हानी असून ती पोकळी भरून निघणे शक्य नाही. कारण आत्ताच्या वातावरणात असे निःस्वार्थ कार्यकर्ते नव्याने निर्माण होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
सरिता खानचंदाणी या पेश्याने वकील असल्या तरी त्या वकिला प्रमाणे कधी वागल्या नाहीत. सामाजिक समस्यांसाठी त्या फी न आकारता अनेक प्रकरणात लढा देत होत्या. त्यांच्या हिराली फौंडेशन च्या वतीने त्या अनेक सामाजिक उपक्रम राबवित असत. उल्हास नदीतील जल प्रदूषण असो की राजकीय नेत्यांचे DJ द्वारे होणारे ध्वनी प्रदूषण असो त्याविरोधात आवाज उठविण्यात नेहमीच अग्रेसर असत. त्यांनी खासदार, आमदार अश्या बड्या असामींच्या विरोधातही गुन्हे दाखल केले होते. वृक्ष संवर्धनाचा त्या प्रचारक होत्या. त्यामुळे कुठेही वृक्षतोड झाली तर त्या तुटून पडत. महापालिकेचे अधिकारी व अग्नीशमन अधिकारीही त्यांना वचकून असत. महापालिकेतील गैरव्यवहाराबाबत त्या उच्च न्यायालयात धाव घेत. Antalia संकुला जवळ नदी किनारी आमदारांनी बांधलेल्या घाटा विरोधात त्यांनी याचिका दाखल करून त्यास स्थागिती मिळवली होती. अंबरनाथ फेस्टिवलच्या ध्वनी प्रदूषण प्रकरणी त्यांनी खासदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मिरवणूक, धार्मिक उत्सवाच्या वेळी होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यात त्या अग्रेसर होत्या. त्यांचा राजकीय नेत्यांनी इतका धसका घेतला होता की त्यांच्या घराच्या १०० मिटर आधी व १०० मिटर नंतर ते भोंग्यांचा आवाज अतिशय कमी करीत असत. वृक्षतोड करण्याची कोणाची हिम्मत होतं नसे.
एकदा स्थानिक नगरसेवकाने जेव्हा मूळ लोकेशन बदलून स्वतःच्या राजकीय लाभासाठी एका गृहसंकुलात बगीच्याचे काम सुरू करताच त्यांनी आक्षेप घेतला होता. त्यावेळी त्यांना मारहाणही झाली होती. तरी देखील त्यांनी ते बेकायदेशीर काम रोखले होते. त्यामुळे महापालिकेचा भूखंड गिळंकृत करण्याचे त्या लोकप्रतिनिधीचे मनसूबे उधळले गेले होते. एका राजकीय कार्यकर्त्याने प्रतिबंधित क्षेत्रात आपला वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला असता त्यास विरोध केला व वैमनस्य पत्करले होते. याच परिसरात एका दिग्गज नेत्याने सार्वजनिक शौचालयावर अतिक्रमण करून आपले कार्यालय थाटले असता त्यास प्रखर विरोध केला. अखेर कायदेशीर लढा देऊन त्या दबंग नेत्याचे कार्यालय सील करण्यास भाग पाडले.
अश्या प्रकारे पर्यावरण रक्षण, वृक्ष संरक्षण, कायदा सुव्यवस्था राखणे व त्याचे पालन करण्यासाठी त्यांनी सर्वांशी पंगा घेतला. त्यामुळेच दुखावलेले सर्व विरोधक तिला घेरण्याचा डाव आखत होते. सततच्या विरोध व संघर्षामुळे त्यांच्यात वैफल्यग्रस्तता आली होती. आज त्यांच्या सहनशक्तीने सीमा ओलांडली असावी, त्यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे.
सरिता खानचंदानी यांच्या अकस्मात निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कारण त्या सुशिक्षत व संवेदनशील समाज सेविका होत्या. अनके बिकट समस्या त्या लिळ्या हाताळत असत. माझ्या अन्याय विरोधी संघर्ष समितीस त्या नेहमीच सहकार्य करीत असत. माझ्या कडे येणाऱी अनेक कौटुंबिक प्रकरणे मि त्यांच्या कडे पाठवत असे. त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये पदे भूषवली व त्यांना न्यायही दिला. त्यांना अनेक सन्मान व पुरस्कार लाभले होते. त्यांच्या जाण्याने उल्हासनगर मधील एक धगधगती मशाल विझली. आज त्यांचे विरोधक जे त्यांना आपल्या शत्रू मानत त्यांच्या आत्म्यास आज शांती लाभली असेल. ज्यांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले ते मात्र सुखाने जगू शकणार नाही




