बदलापूर पालिकेत लाचलुचपत विभागाचा दणका; लेखाधिकारी विकास चव्हाण सह मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने मागितली १.३४ लाखांची लाच! गुन्हा दाखल

बदलापूर (प्रतिनिधी):बदलापूर नगरपरिषदेत भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण समोर आले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली आहे. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे लेखाधिकारी विकास चव्हाण यांच्यावर १ लाख ३४ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यात मुख्याधिकाऱ्यांच्या नावाचाही उल्लेख असल्याने पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार प्रदीप दिनकर कंदलकर यांनी पालिकेमार्फत काही कामे केली होती. या कामांची देयके (बिले) आणि सुरक्षा ठेव (Security Deposit) मिळून एकूण २२ लाख ४३ हजार रुपयांची रक्कम तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात आली होती. हे काम करून दिल्याचा मोबदला म्हणून लेखाधिकारी विकास चव्हाण यांनी स्वतःसाठी आणि मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासाठी टक्केवारीनुसार लाचेची मागणी केली.
लाचेचे गणित:
तक्रारदाराने केलेल्या आरोपांनुसार, चव्हाण यांनी एकूण बिलाच्या ६% प्रमाणे स्वतःसाठी आणि मुख्याधिकाऱ्यांच्या नावावर ५% अशा प्रकारे लाचेची मागणी केली होती. ही रक्कम सुमारे १ लाख ३४ हजार ५०० रुपये इतकी होते.
कारवाईचा तपशील:
आरोपी: विकास चव्हाण (लेखाधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपरिषद)
गुन्हा दाखल ठिकाण: बदलापूर पूर्व पोलीस ठाणे
कलम: भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७
तपास: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. नगरपरिषदेतील या ‘टक्केवारी’च्या कारभारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात आणखी कोणकोणते बडे मासे गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




