स्वराज्याचा सूर्य मावळला, पण तेज आजही कायम: छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी विशेष

३ एप्रिल १६८० हा दिवस मराठ्यांच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. रायगडाच्या उंच शिखरावर स्वराज्याचा हा ‘जाणता राजा’ अनंतात विलीन झाला. महाराज शरीराने आपल्याला सोडून गेले, पण त्यांनी निर्माण केलेले विचार आणि स्वराज्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जिवंत आहे.
“शून्यातून विश्वनिर्मिती”
शिवाजी महाराजांचे आयुष्य म्हणजे केवळ लढायांचा इतिहास नाही, तर ती एक नैतिक क्रांती होती. ज्या काळात गुलामीचे सावट गडद होते, त्या काळात महाराजांनी ‘रयतेचे राज्य’ स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले. त्यांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत, तर माणसांची मने जिंकली.
“लोककल्याणकारी राजा”
महाराजांच्या स्वराज्यात रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावण्याची कोणाची हिंमत नव्हती. स्त्रियांचा आदर, शेतकऱ्यांची काळजी आणि अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती, हेच त्यांच्या प्रशासनाचे मुख्य सूत्र होते. आजच्या आधुनिक काळातही त्यांचे ‘मैनेजमेंट’ आणि ‘गनिमी कावा’ जगभरातील लोकांसाठी अभ्यासाचा विषय आहे.
“विचारांचे सोने”
महाराजांनी आपल्याला शिकवले की, संकट कितीही मोठे असले तरी जिद्द आणि बुद्धीच्या जोरावर त्यावर मात करता येते. ‘स्वराज्य’ टिकवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण केवळ त्यांच्या प्रतिमेचे पूजन न करता, त्यांच्या पराक्रमाचा, शिस्तीचा आणि नैतिकतेचा वारसा जपण्याचा संकल्प करूया.
“प्रौढ प्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!”





