पुण्यात नवा राजकीय संघर्ष, “मोदींसाठी गर्दी चालते, मग राहुल गांधींसाठी जमावबंदी का?” – NSUI चा फडणवीस सरकारला संतप्त सवाल

पुणे:काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI चे पुणे जिल्हा आणि शहर सरचिटणीस साहेबराव क्षीरसागर यांनी पुणे प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांच्या आगामी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लागू करण्यात आलेल्या जमावबंदीवरून आता नवा राजकीय वाद पेटला आहे.काय आहे नेमका वाद?काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेड परिसरात आले होते. त्या वेळी तेथे प्रचंड गर्दी जमली होती, मोठ्या सभा झाल्या आणि जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शनही करण्यात आले. “मोदी आले की गर्दी सुरक्षित आणि राहुल गांधी आले की जमावबंदी?” असा रोखठोक सवाल आता काँग्रेस आणि NSUI कडून उपस्थित केला जात आहे.
साहेबराव क्षीरसागर यांनी समाजमाध्यमांवर जाहीर भूमिका मांडत थेट फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. हा प्रश्न फक्त राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचा नसून लोकशाहीतील समानतेचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नियम सर्वांसाठी सारखे आहेत की केवळ सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीनुसार बदलतात, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.राहुल गांधी यांच्या दौऱ्यापूर्वीच पुण्यातील या जमावबंदीच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधक याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.




