Uncategorized

बदलापूर ! गृप ग्रामपंचायत राहटोली हद्दीत जिन्स कारखान्यांचा ‘केमिकल’ विळखा; शेतीची राखरांगोळी, शेतकरी आक्रमक,,

बदलापूर:
बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या राहटोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या आशीर्वादाने बेकायदेशीर जिन्स कारखान्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. या कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या घातक रासायनिक सांडपाण्यामुळे परिसरातील सुपीक जमिनीचा पोत पूर्णपणे खराब झाला असून, शेतीची मोठी नासाडी होत आहे. आपल्या डोळ्यादेखत जमिनीची राखरांगोळी होत असल्याचे पाहून स्थानिक शेतकरी आता संतप्त झाले असून, प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


जमिनी झाल्या नापिक, पाण्याचे स्त्रोतही धोक्यात!
राहटोली परिसरात गेल्या काही काळापासून छुप्या पद्धतीने जिन्स वॉशिंग आणि रंगाचे कारखाने फोफावले आहेत. या कारखान्यांना कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी नसल्याचे समजते. जिन्सवर प्रक्रिया केल्यानंतर उरणारे निळे आणि विषारी रसायनमिश्रित पाणी थेट उघड्यावर किंवा नाल्यांमध्ये सोडले जात आहे. हे विषारी पाणी शेतात शिरल्याने उभ्या पिकांचे नुकसान होत असून, जमीन कायमची नापिक होण्याच्या मार्गावर आहे. केवळ जमीनच नव्हे, तर भूगर्भातील पाणीही दूषित होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.


प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
एकीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कडक नियम असताना, इतक्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कारखाने चालतातच कसे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. स्थानिक ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाच्या आशीर्वादानेच हे ‘काळे’ कृत्य सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही या कारखान्यांवर ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.


आता ‘आरपारची’ लढाई!
“आमच्या पूर्वजांनी कमावलेली शेती या विषारी रसायनांमुळे मातीमोल होत आहे. जर हे कारखाने तातडीने बंद झाले नाहीत आणि दोषी मालकांवर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर आम्ही तीव्र आंदोलन करू,” असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
आता या प्रकरणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) आणि महसूल विभाग गांभीर्याने लक्ष देऊन या ‘केमिकल’ माफियांचा बंदोबस्त करणार का? की शेतकऱ्यांचा बळी दिला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!