कल्याण! वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी चार्टर्ड अकाऊंट ( सिए) परिक्षा उत्तीर्ण,, अभिनंदनाचा वर्षाव

कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी असलेल्या सुप्रियाने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कल्याण शहरातील पंकज बडगुजर यांची कन्या सुप्रियाने ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या जानेवारी २०२६ सत्रातील परीक्षेत १५३ गुण मिळवत सीए होण्याचा मान पटकावला. अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत तिने केलेले यश विशेष ठरत आहे.
पंकज बडगुजर हे अनेक वर्षांपासून कल्याणमध्ये वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतानाही त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी कोणतीही कमी पडू दिली नाही. सुप्रियालाही वडिलांच्या कष्टांची जाणीव असल्याने तिने सातत्याने मेहनत घेत हे यश मिळवले.
सुप्रियाच्या या यशामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, परिसरातील नागरिक, मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




