Uncategorized

बदलापूरजवळ खड्ड्याने घेतला महिलेचा बळी; गणपती दर्शनावरून परतताना दुर्दैवी अपघात,,

बदलापूर परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्या आपल्या मुलासोबत टिटवाळा येथे गणपतीचे दर्शन घेऊन बदलापूरला परतत होत्या.,,,
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव अरुणा अरुण कुलकर्णी असून त्या कल्याणमधील एकविरा नगर परिसरातील रामदास सोसायटी येथे वास्तव्यास होत्या. २८ जून रोजी रात्री त्या मुलगा प्रतीक कुलकर्णी याच्यासोबत दुचाकीवरून टिटवाळा येथे गणपती दर्शनासाठी गेल्या होत्या.


दर्शन करून परतत असताना जांभळे गावाजवळील नदीवरील पुलावर रस्त्यातील मोठा खड्डा अचानक समोर आला. दुचाकी चालवत असलेल्या प्रतीकने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट खड्ड्यात जाऊन पडले. या अपघातात मागे बसलेल्या अरुणा कुलकर्णी रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर त्यांना तातडीने बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणखी किती निष्पाप जीवांचा बळी जाणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!