देश

जस्टीस लोया .. तुम्ही ती शंभर कोटींची ऑफर घ्यायला हवी होतीत. आज तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदी असता आणि तुम्हीसुद्धा म्हणाला असता.,, “भारतमाता की जय!”

काल या माणसाला जाऊन अकरा वर्षे झाली. आपल्या सगळ्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला परत मरुन तेवढीच वर्ष झाली असतील. डिसेंम्बर २०१४ मध्ये एका हाय प्रोफाइल केसवर काम करणाऱ्या ते ही सीबीआय कडून असलेल्या केसवर तेही सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असलेल्या केसवर न्यायाधीश होता हा माणूस. त्याने फेव्हरेबल निर्णय द्यावा म्हणून फार दबाव होता आणि मुंबईच्या एका न्यायालय जगतातील मोठ्या व्यक्तीने हे प्रकरण ‘दाबण्यासाठी’ चक्क शंभर कोटींची ऑफर केली होती म्हणे… डिसेंबर १५, २०१४ रोजी निकालाचं वाचन होणार होतं त्या आधीच नागपूरला रवी भवन या सरकारी निवासस्थानी यांचा मृत्यू झाला, जो वादग्रस्त ठरला. जिगरबाज पत्रकारांनी या वर स्टोरीज केल्या. विरोधी पक्षांनी आवाज उठवला. सुप्रीम कोर्टच्या चार न्यायाधीशांनी मला वाटतं भारताच्या इतिहासात प्रथमच ऑन टीव्ही पत्रकार परिषदेत आपल्यावर दबाव येत असल्याचं सांगितलं….

आम्ही सगळे कुठलातरी गांजा मारून सुस्त होतो. कधी कधी वाटतं तशीच ती स्वस्त देशभक्तीची नशा परत चढावी. पोस्टकार्ड व तत्सम पट्कन चढणाऱ्या वंदे मातरम पोस्ट्स शेअर करत राहाव्यात. यांना असंच पाहिजे म्हणत वर्षानुवर्षाचा षंढ द्वेष कुरवाळत रहावा.

फोटोतला माणूस माहीत नसेल तर सांगतो जस्टीस ब्रिजगोपाल हरकिशन लोया आहेत. सोहराबुद्दीन चकमक व खून प्रकरणावर ते नियुक्त होते. मुख्य आरोपी अमित शाह जे आता भारताचे गृहमंत्री आहेत, ते होते. लोया यांच्या मृत्यूनंतर नियुक्त झालेल्या न्यायाधीशांनी शाह यांची निर्दोष मुक्तता केली.

पण जस्टीस लोया कसे गेले काय झालं याचा राजकारणी सोडा पण पत्रकार म्हणवून घेणाऱ्या मिडियानेही पाठपुरावा केला नाही. एकेकाळी जेसीका लाल, तंदूर केस आणि अनेक हाय प्रोफाइल प्रकरणं खणून न्यायव्यवस्थेत खरोखर चौथा स्तंभ बनलेल्या मीडियाची दुर्गती दोन हजार च्या नोटेत चीप बसवलीय हे सांगण्यापर्यंत व्हावी?

पण त्यांचा तरी काय दोष? मागणी तशी पुरवठा. आपल्याकडे भारतमाता की जय आणि सीमेवर जवान म्हटलं की सगळं संपतं. मग त्याच सीमेवर पुलवामा मध्ये २०० किलो स्फोटकं कुठून आली हा प्रश्न विचारायचा नसतो. बघाच तुम्ही २०२६ चा १४ फेब्रुवारी हा भारी इव्हेंट असणारे आणि आपण सगळे परत फेसबुक, whatsapp वर तेच ते शौर्यदिन वाले मेसेजेस फिरवणार आहोत. आपल्याला हे व्यसन लागलंय फुटकळ देशभक्तीचं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री फडणवीस नाही का एका शेतकऱ्याला त्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देता येत नाही तेव्हा त्याला खाली बसवतात आणि ओरडतात, “बोलो भारतमाता की जय!”

जस्टीस लोयांच्या पोरसवदा मुलाने पत्रकारांसमोर येत आपली कुणाबद्दलही तक्रार नसल्याचं म्हटलं आहे. तो विडिओ पाहिला ना की आतून हादरायला होतं, मग कधी कधी सोशल मीडियावर आपल्या खऱ्या नाव गावासहित सरकार वर टीका करणाऱ्यांचं न पाहिलेलं कुटुंब दिसू लागतं. वाटतं… खरंच कशाला बोंबलतोय आपण काही लोक? सगळं मस्त तर चाललंय. सब चंगा सी!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!