मुंबई! सेवानिवृत्त पेन्शन पिडीत शिक्षक कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मैदानात,, सरकारला घरचा आहेर,,,

मुंबई प्रतिनिधी :
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त होऊन टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांनी आज मुंबईतील ऐतिहासिक आजाद मैदानावर जोरदार आंदोलन छेडले. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातून आलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी एकमुखाने घोषणाबाजी करत आपला तीव्र संताप व्यक्त केला.
या आंदोलनात शिक्षक नेते तथा शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जोशपूर्ण भाषण करत सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. टप्प्याटप्प्याने अनुदानावर आणून त्यांच्या पेन्शन हक्कावर गदा आणली गेली आहे. हा अन्याय दूर होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत सांगितले की, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांना हा विषय प्रत्यक्ष भेटून मांडण्यात येईल व तात्काळ बैठक आयोजित करून शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शासन पातळीवर या प्रश्नावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
म्हात्रे सरांनी पुढे सांगितले की, हा विषय अनेक वेळा अधिवेशनामध्ये त्यांनी स्वतः तसेच शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांनी सातत्याने मांडलेला आहे. “पेन्शन हा हक्काचा प्रश्न आहे. लवकरच या पेन्शन पीडित बांधवांना न्याय मिळेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आंदोलनात विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे नेते तसेच मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. “जुनी पेन्शन हक्काचीच” अशा घोषणांनी आजाद मैदान दणाणून गेले.
दरम्यान, या आंदोलनामुळे राज्यातील पेन्शन प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सरकार यावर कोणती ठोस भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी पेन्शन पिडीत संघटनेचे पदाधिकारी व पेन्शन पीडित बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




