ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर हल्ल्याची घटना; पोलिसांकडून चौकशी सुरू

उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक चार परिसरात ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. होली फॅमिली शाळेजवळ ही घटना घडली असून तीन अज्ञात इसमांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
मालवणकर हे आपल्या मोटार सायकल वरून जात असताना त्यांच्या गाडीला डॅश देण्यात आला. त्यानंतर त्यांना खाली उतरवून ढकलण्यात आले आणि पडल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र स्थानिक नागरिक धावून आल्याने लागलीच पळून गेले, या घटनेनंतर त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या हल्ल्याबाबत दिलीप मालवणकर यांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांनी रात्री फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या एका लेखाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संबंधित लेखामध्ये बोडारे बंधूंविषयी उल्लेख असल्याने त्यांनी त्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. मात्र, हे सर्व आरोप व संशय असून याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.




