भारतातील खरे शिक्षणाचे जनक : महात्मा ज्योतिराव फुलेच-सुभाष खैरनार

भारतीय समाजात शतकानुशतके शिक्षण हा अधिकार मोजक्याच घटकापुरता मर्यादित ठेवण्यात आला होता. शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया आणि गरीब जनतेला शिक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित केले गेले. या अंधकारमय स्थितीत समाजाला प्रबोधनाचा प्रकाश दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले हे खरेच भारतातील शिक्षणाचे जनक ठरतात.
११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात जन्मलेले ज्योतिराव यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल उचलले. सन १८४८ मध्ये पुण्यातील भांडग्यांच्या वाड्यात त्यांनी आपल्या सहचारिणी सावित्रीबाई फुले यांच्या साहाय्याने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. समाजातील तीव्र विरोध, अपमान आणि हल्ले सहन करूनही त्यांनी अध्यापनाचे कार्य अखंड सुरू ठेवले. पुढे फुले दाम्पत्याने विधवाशिक्षण, मुलींचे शिक्षण आणि अस्पृश्य घटकांसाठी अनेक शाळा स्थापन करून शिक्षण सर्वांसाठी खुले केले.
महात्मा फुले यांच्या मते शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. शिक्षण केवळ वाचनलेखनापुरते मर्यादित नसून ते समता, स्वाभिमान आणि न्यायाची जाणीव देणारे असावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी सर्वांसाठी मोफत शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञाननिष्ठ विचारसरणी यांचा पुरस्कार केला. त्यांचा प्रसिद्ध संदेश “शिकाल तर टिकाल” आजही तितकाच मार्गदर्शक आहे.
फुले ठामपणे सांगत की अशिक्षित जनता सहज शोषणाला बळी पडते. शिक्षणामुळे माणूस आपले हक्क ओळखतो, अन्यायाविरुद्ध उभा राहतो आणि आत्मसन्मानाने जगतो. म्हणूनच त्यांनी शोषित, वंचित समाजाला शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
महात्मा फुले यांनी पेटवलेला मशाल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेला. “शिक्षण हेच शस्त्र आहे” या त्यांच्या घोषणेने वंचित समाजाला नवजीवन दिले. भारतीय संविधानात त्यांनी शिक्षणाला मूलभूत स्थान दिले. संविधानातील कलम ४५ अंतर्गत ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे प्रावधान केले. पुढे हेच कलम बदलून कलम २१(अ) अंतर्गत शिक्षणाचा अधिकार मूलभूत हक्क म्हणून समाविष्ट करण्यात आला.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचा मार्ग सर्वांसाठी खुला करून सामाजिक क्रांती घडवली. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेले प्रयत्न आजही प्रेरणादायी आहेत. डॉ. आंबेडकरांनी घटनात्मक स्तरावर शिक्षणाचा अधिकार सुरक्षित करून या कार्याला बळकटी दिली. म्हणूनच फुले हे “भारतातील खरे शिक्षणाचे जनक”, सावित्रीबाई फुले “महिला शिक्षणाच्या जननी”, आणि डॉ. आंबेडकर “शैक्षणिक हक्काचे शिल्पकार” म्हणून भारतीय समाजाच्या इतिहासात सदैव अजरामर राहतीलच.



